॥ भूमिका ॥

॥ भूमिका ॥

हे सर्वात्मका सर्वेशा । हे जगत्पित्या जगदीशा ।
हे परब्रह्म परमेशा । हे निर्गुण निराकारा ॥१॥

हे आदिबीजा अनंता । हे सर्वव्यापी दिगंता ।
हे सकलसृष्टी नियंता । हे अविनाशा ॐकारा ॥२॥

मी न असे संत कुणी । नाही ज्ञानी ऋषी मुनी ।
नसे कवि मी सकलगुणी । मी दास तुझ्या पायीचा ॥३॥

मी पातकी पापकर्मी । मी अविचारी अधर्मी ।
परि जाणतो एक मर्मी । मज आधार तूच आता ॥४॥

मी न जाणतो शास्त्रवेद । मला कळेना अर्थ-भेद ।
तरी नाही भीती खेद । तू असता पाठिशी ॥५॥

जशी काया आत्म्यावीण । तेजाविना तो सूर्य दीन ।
शब्द माझे अर्थहीन । तुझ्यावीण भासती ॥६॥

तरी हे श्री सर्वव्यापका । व्याप माझ्या शब्द प्रत्येका ।
म्हणुनी हे विश्वपालका । प्रथम तुला मी प्रार्थितो ॥७॥

हृदयी तुझा होता वास । होई ॐकार प्रत्येक श्वास ।
म्हणुनी तुझा घेतला ध्यास । हे ॐकार स्वरूप शब्दब्रह्मा ॥८॥

तसा तुझा स्पर्श होता । सक्षम होईन मी भगवंता ।
अनुवादन्या ही भगवद्गीता । इवल्या हाता शक्ति दे ॥९॥

निघोनी जावे सारे दुर्गुण । मुक्त व्हावे भवपाशांतून ।
आणि फिटावे आईचे ॠण । म्हणूनी कार्य हे घेतले ॥१०॥

न व्हावा शब्दांचा अतिरेक । हा प्रयत्न व्हावा सुरेख ।
यावा मजला अर्थविवेक । म्हणुनी मुकुंदा शक्ति दे ॥११॥